By  
on  

'हिंग पुस्तक तलवार'चा हास्यकल्लोळ आता 31 ऑगस्टपासून 

निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित 'हिंग पुस्तक तलवार' ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच मित्रपरिवारातील सर्वांचेच व्यक्तिमत्वही सारखे नसते. अशाच वेगवेगळ्या पार्श्वभूमीचा मित्रपरिवार एकत्र येऊन प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहे. नुकताच 'हिंग पुस्तक तलवार'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.

या वेबसिरीजमध्ये काही ना काही खासियत असणाऱ्या भन्नाट व्यक्तिरेखा आहेत. कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लफ्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसेंट अशी ‘अमृता’, दुसऱ्यांची लग्न जुळवणारा पण स्वतःच्या गर्लफ्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु  इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्युशन देणारा ‘पांडे’.  ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी ही वेबसिरीज लिहिली असून यात अक्षयची भूमिका शौनक चांदोरकर, अमितची भूमिका सुशांत घाडगे, अमृताची भूमिका केतकी कुलकर्णी, समरची भूमिका क्षितिश दाते, कौस्तुभची भूमिका नील सालेकर, सानिकाची भूमिका मानसी भवाळकर आणि पांडेची भूमिका अलोक राजवाडेने साकारली आहे.

येत्या 31 ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे

 या वेबसिरीजविषयी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या जॉनरचा कन्टेन्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन वेगळे, थोडे गंभीर विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर आता प्लॅनेट मराठी 'हिंग पुस्तक तलवार'च्या माध्यमातून प्रेक्षकांना भरभरून हसवण्यासाठी सज्ज झाले आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय धमाका उडतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हास्यकल्लोळ असलेली ही वेबसिरीज तरुणाईवर आधारित असली तरी सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे. सध्याच्या परिस्थितीत मित्रांना भेटणे, धमाल, मजामस्ती करणे दुरापास्त होत आहे. मात्र ही वेबसिरीज तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आहे आणि म्हणूनच ही सिरीज तुम्हाला तुमच्या जास्त जवळची वाटेल.''

 

Recommended

PeepingMoon Exclusive