आपण सगळे जण जिंकण्यासाठी धडपडत असतो, पुढे जात असतो. पण, आज अशा एका कलाकाराला भेटणार आहोत. ज्याने हरण्यात आनंद मानला. सतत हरणं आणि त्यातून उठून कामाला लागणं. अश्या प्रकारे आपल्या आयुष्याची जर्नी ज्याने सुरु केली. जो आता आपल्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकतो आहे. तो कलाकार म्हणजे तो संभाजी ससाणे अर्थात भाडिपाच्या बेरोजगार (B.E.ROJGAR) सिरीज मधला पापड्या.
संभाजी ससाणेचा प्रवासही थक्क करणारा आहे.पुण्यातल्या हिराबागेत झोपडपट्टीत संभाजीचं आयुष्य गेलं. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यात संभाजीने आवड म्हणून गणेशोत्सवात आवड म्हणून स्ट्रीट प्ले करायला सुरुवात केली. त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं. त्याच प्रमाणे ड्रामा स्कूल मुंबईमधून अभिनयाचे धडे घेतले. त्याच दरम्यान काही चांगल्या नाट्य संस्थांमधून त्याचा नाटकाचा प्रवास सुरु झाला. अनेक नाटकांसाठी बॅकस्टेजचं कामही संभाजीने केलं.
आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल संभाजी सांगतो,"आयुष्यात अभिनयच करायचा असं काही लहानपणी ठरवलं नव्हतं. जेव्हा तुम्ही झोपडपट्टीत वाढता तेव्हा रोज १०० गोष्टी तुम्हाला खाली घेऊन जाऊ शकता. मी खूप बंडखोर होतो, गुंड प्रवृत्तीचा होतो. आता असं वाटतं माझ्या आई वडिलांनी मला कसं सांभाळलं असेल ? पण नाटक करण्यात मला मजा येत होती आणि याच एका गोष्टीने मला तारलं. आत्तापर्यंत कलाकार म्हणून एक गोष्ट शिकलो आहे . तुम्हाला अपयश पचवायची ताकद ठेवावी लागते. त्याहूनही यश मिळालंच तर तेही पचवता आलं पाहिजे."
ड्रामा स्कूल नंतर संभाजीने तातुर्फे, मुक्तीधाम अशा काही नाटकात काम केले. सध्या त्याचं लव अँँड लावणी हे नाटक येत आहे. त्याचबरोबर वाघे-्या, लाल बत्ती या सिनेमातही काम केले आहे. विविध कामं करता करता संभाजीला भाडीपाची बेरोजगार ही सिरीज मिळाली. त्यातले पापड्या हे पात्र प्रेक्षकांना आवडले. या बद्दल संभाजी सांगतो. "पापड्या साकारताना त्या पात्रात असलेला 'आशावाद' शोधणं खूप मजेदार होतं. सतत अपयशी होऊनही, पुन्हा जिद्दीने नवीन करण्याची त्याची धडपड, त्याची सकारात्मकता हे आजच्या तरुणांना आपलंसं वाटलं. मला कोल्हापुरी भाषेत असणारा ठसका, रांगडेपणा लोकांपर्यंत पोहचवता आला याचा आनंद आहे. ”
संभाजीला स्वतःला विविध भूमिकांमध्ये पाहायचे आहे. आगामी काळात दोन सिनेमा आणि बेरोजगार -२ मधून संभाजी भेटीला येणार आहेत.