प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाची जादू मराठी सोबतच विविध प्लॅटफॉर्मवरही नेहमीच दाखवते. लवकरच एका हटके वेबसिरीजमधूून सोनाली चाहत्यांच्या भेटीला येतेय. ‘हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स’ या एमेझॉन प्राईम व्हिडीओच्या हिंदी वेबसिरीजमध्ये सोनाली मुख्य भूमिकेत झळकतेय. या वेबसिरीजमध्ये ७०-८० चा काळ दर्शवण्यात आल्याने सोनालीच्या या नव्या भूमिकेची सगळ्यांनाच खुप उत्सुकता आहे.
प्राइम व्हिडिओने त्यांच्या हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स या सर्वांनी बघाव्याच अशा आगामी हलक्याफुलक्या ड्रामेडीचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या बालपणातील आनंदी क्षणांची आठवण करून देईल. ही मालिका एका लहान मुलाच्या निष्पाप विश्वाची झलक तर दाखवतेच, शिवाय, लहान मुले विरुद्ध मोठी माणसे अशा वैश्विक कथेचेही दर्शन घडवते. आनंद सुप्सी यांच्या त्याच नावाच्या पुस्तकावरून घेतलेल्या या मालिकेची निर्मिती ओएमएल स्टुडिओजने केली आहे, तर व्ही. के. प्रकाश यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. या मालिकेत अश्वंथ अशोककुमार, आशीष विद्यार्थी, सोनाली कुलकर्णी व कार्तिक विजन प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स ही मालिका 16 डिसेंबर 2022 रोजी भारतात व जगभरातील 240 देश-प्रदेशांमधील जागतिक प्रीमियरसाठी सज्ज आहे.
दक्षिण भारतातील एका शांत गावात घडणाऱ्या या गोष्टीचे ट्रेलर प्रेक्षकांना एका साध्या विश्वाची व आनंद ऊर्फ डब्बा नावाच्या छोट्या मुलाच्या आयुष्याची झलक दाखवते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आनंद करत असलेल्या असंख्य साहसांच्या निमित्ताने त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळींशीही आपला परिचय होतो, माफक तरीही हव्याशा वाटणाऱ्या काळाच्या जादूचा व मौजमजेचा ध्यास प्रेक्षकांना लावण्याची क्षमता या मालिकेत आहे. या मालिकेत डब्बाच्या वडिलांची भूमिका करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आशीष विद्यार्थी या मालिकेबद्दल म्हणाला, ''अत्यंत वेगाने पुढे जाणाऱ्या या जगाशी तुलना करता हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स अगदी उलट आहे आणि हा विरोधाभास खूपच दिलासा देणारा आहे. ही एक मनाला सुखावणारी कथा आहे आणि ही ज्या काळात आयुष्य खूपच सुलभ होते, त्या काळात ही कथा प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. या मालिकेसाठी काम करण्याचा अनुभव खूपच आनंद देणारा होता आणि असे छान सहअभिनेते व अप्रतिम क्रू मिळाल्याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटत आहे. ही मालिका बघणारा प्रत्येक जण त्याच्या बालपणात, शाळेच्या दिवसांत परत जाईल अशी आशा मला वाटते.”
याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “माझ्या पहिल्या अॅड फिल्मचा दिग्दर्शक व्हीकेपीसोबत काम करताना मला खूपच मजा आली. बारकावे हेरण्यात तो माहिर आहे. हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स ही मालिका दैनंदिन धकाधकीच्या गुंतागुंतींशिवाय अध्ययनाचा एक अनन्यसाधारण अनुभव देते. खरे तर मलाही माझ्या स्वत:च्या बालपणाची आठवण या मालिकेने करून दिली. त्या काळात इंटरनेट किंवा फोन नव्हते; ही एक सुखद, नोस्टॅल्जिक सफर होती हे मी नाकारू शकत नाही. आम्ही या मालिकेत खूप मनापासून काम केले आहे. जगभरातील प्रेक्षक या हलक्याफुलक्या नाट्याचा आनंद घेतील अशी आशा मला वाटते.” हाफ पॅण्ट्स फुल पॅण्ट्स मालिकेचा प्रीमियर भारतात व जगभरातील 240 देश-प्रदेशांत 16 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवरून होणार आहे.