जास्त पैसे घेऊन थिएटर कमी दिल्याच्या रागातून सिनेमातील कलाकारांनी वितरकांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व जबर मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातली जंगली महाराज रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला आहे. ‘कॉलेज डायरी’ या सिनेमातील कलाकारांनी वितरकांविरोधात आणि वितरकांनी कलाकारांविरोधात यांसंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
कॉलेज डायरी हा सिनेमा पूर्वी 16 मार्चला प्रदर्शित होणार होता पण आता 8 मार्चला प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 85 थिएटर्समध्ये दाखवण्याचे आश्वासन वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर या दोघांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात हा सिनेमा फक्त 45 थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप कलाकारांनी केला. तसेच निर्माते - दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांनीही हाच आरोप केला. याच रागातून सिनेमाचे कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना मारहाण केली. महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी सिनेमासाठी हे पैसे आपली जमिन व घर विकून उभे केले होते असं त्याचं म्हणणं आहे. तसंच सिनेमाला योग्य वेळसुध्दा देण्यात आलेली नसल्याने आपलं पुरतं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच झाल्या प्रकारामुळे नवोदित आणि होतकरु फिल्ममेकर्सनी अशा वितरकांना बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.