जुन्याची जाण व नव्याचे भान जोपासत आजवर विविध क्षेत्रात आपल्या देशाने यशस्वी वाटचाल केली आहे. याच जाणीवेतून आपलं ध्येय साध्य करणाऱ्या दोन तरुणांच्या जिद्दीची कथा सांगणारा 'कार्निवल मोशन पिक्चर्स'चा ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. आज २३ डिसेंबरला ‘किसान दिना’च्या निमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ डिसेंबरला ‘किसान दिन’ साजरा केला जातो. 'मेरे देश की धरती' या आगामी हिंदी चित्रपटाच्या मोशन टाईटल पोस्टर लाँचच्या माध्यमातून 'कार्निव्हल मोशन पिक्चर्स' शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती, फराझ यांचं दिग्दर्शन आणि विक्रम यांनी संगीत दिग्दर्शित केलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे. शेतकऱ्यांप्रती काहीतरी करण्याच्या उद्देशाने भारावलेले दोन इंजिनिअर्स तरुण आपल्या गावचा कसा कायापालट करतात याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहे.‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची असून कथा नील चक्रवर्ती यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांनी केले आहे. प्रोडक्शन डिझायनर संजॉय दासगुप्ता तर वेशभूषा सुचिता गुलेचा आहेत. लोव पाठक कार्यकारी निर्माता आहेत.