अक्षय कुमारचा ‘चुंबक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘72 मैल –एक प्रवास’नंतर अक्षय चुंबकसह मराठी प्रेक्षकांसमोर एक हद्यस्पर्शी आणि हटके विषय सादर करत आहे. गीतकार-संगीतकार आणि अभिनेता स्वानंद किरकिरेची यात प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाची निवड नुकतीच इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नसाठी करण्यात आली आहे. तसंच मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुध्दा या सिनेमाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं.
चुंबकबद्दल बोलताना अक्षयने ट्विट केलं आहे, “हा सिनेमाने मला खुप काही शिकवलं. म्हणूनच पहिल्यांदा असं घडतंय की मी ठरवलं हा सिनेमा अक्षय कुमार प्रस्तुत आहे, हे सर्वांना कळायला हवं. हा सिनेमा सादर करताना माझ्या मनात अभिनाची भावना आहे”
एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्तव्पूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.