एक असा कार्यक्रम ज्यातून घरच्या होममिनिस्टरचा सन्मान केला जातो. हा कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. गेली 16 वर्षे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन आणि घरच्या होममिनिस्टर्सचा सन्मान केला. लग्न होऊन सासरी आलेल्या समस्त महिला वर्गासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच आहे. लॉकडाउनच्या काळातही होम मिनिस्टरचा ऑनलाईन कार्यक्रम रंगला होता. मात्र पुन्हा होम मिनिस्टरचा कॅमेरा हा वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
तेव्हा आदेश भावोजी परत वहिनींना दार उघड वहिनी दार उघड अशी साद घालणार आहेत. पण आता वहिनींच्या सासरी नव्हे तर त्यांच्या माहेरी आदेश भावोजी त्यांची भेट घेणार आहेत. कारण एक नाही तर दोन वहिनींमध्ये पैठणीचा खेळ रंगणार आहे.
या नव्या पर्वात आदेश भावोजी वहिनींच्या माहेरी जाऊन तिथे पैठणीचा खेळ खेळणार आहेत. या निमित्ताने आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक महेंद्र कदम ही जोडी पुन्हा एकत्र काम करतेय. तेव्हा 'होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणीचा' येत्या 4 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.