‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाच्या घवघवीत यशानंतर युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या आगामी ‘जग्गु आणि Juliet’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
मराठीसह बॉलीवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या महेश लिमये यांना ‘यलो’ या संवेदनशील विषयावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा महेश लिमये दिग्दर्शक म्हणून 'जग्गु आणि Juliet’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. एवढच नाही तर अनोख्या संगीताच्या माध्यमातून मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल, 'जग्गु आणि Juliet’ च्या निमित्ताने आपल्या मराठी चाहत्यांना एक बहारदार संगीत आणि पार्श्वसंगीताची खास मेजवानी देणार आहेत. महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप या त्रयींची ही जबरदस्त कथा आणि पटकथा असून गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे संवाद आहेत.
मात्र या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार असून महेश लिमये यांच्या नजरेतून निसर्ग सौंदर्याने नटलेला युरोप या सिनेमात हटके अंदाजात बघायला मिळणार आहे. या सिनेमाविषयी बोलताना निर्माते पुनीत बालन सांगतात की, "आमची पहिली निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक आशयावरील चित्रपटाला रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कोरोनाच्या काळात आम्ही सामाजिक संदेश देणाऱ्या तीन शॉर्टफिल्म्स निर्माण केल्या, त्यांना महाराष्ट्रासह जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०२१ मध्ये प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी वेगळ्या धाटणीचा ‘जग्गु आणि Juliet’ हा चित्रपट घेऊन येत आहोत. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना सहकुटुंब बघता येईल अशी एक अतिशय सुंदर, कलरफुल ‘रॉमकॉम’ कलाकृती, भेट म्हणून देण्याचा आमचा मानस आहे."