आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर रितेश देशमुख आणि जेनेलियाने त्यांच्या आगामी 'माऊली' या सिनेमाची प्रदर्शन तारीख नुकतीच जाहीर केली आहे. त्यांची मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्थान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची निर्मिती करत आहे.
रितेशच्या 'लय भारी' या सुपरहिट सिनेमानंतर लगेचच 'माऊली' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमातील 'माऊली' या व्यक्तिरेखेच्या नावावरुनच फक्त हा सिनेमा असून त्याचा हा सिक्वेल नसल्याचे बोलले जात आहे.
अदित्य सरपोतदार 'माऊली'चे दिग्दर्शन करत असून क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांनी सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. 'लय भारी' या सुपरहिट मराठी सिनेमानंतर रितेश देशमुखचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. यंदा ख्रिसमसच्या आठवड्यात म्हणजेच 21 डिसेंबर 2018 ला 'माऊली' सिनेमा प्रदर्शित होत आहे. या बहुचर्चित सिनेमाची रसिकांना प्रचंड उत्सुकता आहे.