'भाभाीजी घर पर है' हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. त्यातच या मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारणारे कलाकारही चर्चेत असतात. शिल्पा शिंदे नंतर या मालिकेत शुभांगी अत्रे अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसली. आणि आता चक्क या मालिकेतील गोरी मॅम पण बदलतेय. अभिनेत्री सौम्या टंडनने मालिका सोडल्यानंतर नव्या गोरी मॅमचा शोध सुरु होता. हा शोध संपला असून अभिनेत्री नेहा पेंडसे या भूमिकेत दिसणार आहे. सौम्याने साकारलेली ही भूमिका आता नेहा साकारणार आहे.
नेहाने नुकतच या मालिकेच्या सेटवरील पहिला दिवस असल्याची माहिती सोशल मिडीयावर दिली आहे. मात्र सेटवर पोहचण्याआधी नेहाला मुंबईच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला असल्याचं ती सांगते. मात्र या ट्रॅफिकची सवय असल्याचही ती सांगते. नेहाने ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडीओ आणि फोटो शेयर करत या मालिकेच्या सेटवर पहिला दिवस असल्याचं सांगितलं.
नेहा या पोस्टमध्ये लिहीते की, " भाभीजी घर पर है साठी पहिला दिवस. तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकण्याची सवय लावतेय. आणखी काही माहिती शेयर करेल. पण आता तुमच्या शुभेच्छांची गरज आहे."
तेव्हा आता या नव्या भूमिकेत नेहा प्रेक्षकांचं मन जिंकतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेतही नेहा झळकली होती.