कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना आता नव्या वर्षाच्या स्वागतासह दुबईत रंगणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट 2021' या मराठी सिनेमांच्ाय प्रीमियर सोहळ्याच्या तयारीला आता चांगलाच वेग लागला आहे. भारताबाहेरील सिनेमाप्रेमींना आनंद देण्यासाठी आणि मराठी सिनेसृष्टी नव्या ऊर्जेने सज्ज व्हावी यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतच या सोहळ्याच्या आयोजकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी दुबईत प्रीमियर होत असलेल्या सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते.
मराठी चित्रपटाला ‘ग्लोबली कनेक्ट’ करण्याचा आयोजक सचिन कटारनवरे यांच्या प्रयत्नाला दाद देत त्यांच्या धाडसाचे कौतुक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याप्रसंगी केले. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ जाधवही यावेळी उपस्थित होता. प्लॅनेट मराठीचे अक्षय बरदापुरकरही यावेळी उपस्थित होते. तर मिडीया वनचे गणेश गारगोटेही उपस्थित होते. '५ जी इंटरनॅशनल'च्या वतीने आयोजित 'गल्फ सिने फेस्ट 2021' या सोहळ्यात काही निवडक बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. 2021 या नव्या वर्षात सातासमुद्रापार रंगणारा हा सोहळा मराठी चित्रपटांसाठी कमालीचा उत्साहवर्धक ठरेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे 20 ते 23 जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने पुढील तारखांची जुळवाजुळव सध्या सुरु असून लवकरच आयोजकांकडून त्याविषयीची पुढील माहिती कळविण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या या मान्यवर मंडळीनी आयोजक सचिन कटारनवरे यांच्या या अनोख्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.