वस्तू आणि सेवाकर विभागाद्वारे आता सॅनिटरी पॅडला वस्तू आणि सेवाकरातून वगळले आहे. यापूर्वी विविध स्तरांतून स्त्रियांकडून व स्त्री संघटनांकडून सॅनिटरी पॅडवरील सेवा कर हटवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून आता सॅनिटरी पॅड हे जीएसटीमुक्त झाले आहेत. सरकारच्या या स्वागतार्ह निर्णयाबद्दल पॅडमॅनने म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारने नुकताच आनंद व्यक्त केला आहे.
अक्षयने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे हा आनंद शेअर केला, “सॅनिटरी पॅड करमुक्त करण्यात आले ही बातमी ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शारिरिक स्वच्छतेची गरज ओळखून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी जीएसटी कौन्सिलचे मन:पूर्वक आभार मानतो. मला माहितीय की, देशभरातील महिलांना या निर्णयाचा खुप आनंद झाला असेल.”
परवडणा-या दरात सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणा-या अरुणाचलम मुरुगानंथम यांचा जीवनावरील पॅडमॅन या सिनेमात अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली होती. मासिक पाळी आणि त्यादरम्यानची स्वच्छता ही स्त्रियांसाठी किती महत्त्वाची आहे व त्यासाठी सॅनटरी पॅड किती जीवनावश्यक ठरते हे या सिनेमाद्वारे थेट मांडण्यात आले होते.
‘पॅडमॅन’ सिनेमानंतरही अक्षयने स्वत: अनेकवेळा स्त्रियांची मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता व सॅनिटरी पॅड यांच्याबद्दल जनजागृती केली होती. एका मुलाखती दरम्यान तो म्हणाला होता, “फक्त जीएसटी हटवून चालणार नाही. माझ्या मते संपूर्ण देशात सॅनिटरी पॅड मोफत मिळायला हवेत. ही स्त्रियांची मूलभूत गरज आहे. परवडत नाही म्हणून सॅनिटरी पॅड न वापरणा-या स्त्रियांची संख्या देशात मोठी आहे.”