‘आर्ची’ म्हणून आपल्या बिनधास्त आणि ‘सैराट’ अभिनयाने सिनेसृष्टीत सर्वांना ‘याड लावणारी’ रिंकू राजगुरू सध्या काय करते असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच रिंकूने स्टारडमची हवा अनुभवली. आजही युवावर्गात रिंकूची जबरदस्त क्रेझ आहे. पदार्पणातच अप्रतिम भूमिका साकारल्याने रिंकूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वांनाच आता तिच्या आगामी प्रोजेक्टबदद्ल प्रचंड उत्सुकता आहे. सैराटनंतर ती कुठेच पाहायला मिळाली नाही. पण नुकतंच सोशल मिडीयावर तिने अपलोड केलेल्या एका व्हिडीयोनुसार असे समजतेय, की ती लवकरच ‘कागर’ या नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या व्हिडीयोत रिंकू डान्ससोबतच भरपूर धम्माल, मस्ती करताना पाहायला मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे सैराटमधील आर्ची आणि आता ‘कागर’मधलील तिचा लूक यात बरीच तफावत दिसून येत आहे. यात ती फारच स्लिम ट्रिम दिसून येत आहे. ‘सैराट’नंतर त्याच्या साऊथ रिमेकसाठी रिंकूने वजन वाढवलं होतं पण आता आगामी मराठी सिनेमासाठी ती बारीक झाली आहे. ‘कागर’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने सांभाळत असून उदार्णार्थ या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी केली आहे.
'सैराट’नंतर रिंकूकडे ब-याच प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती, परंतु शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याने तिने कोणतेच प्रोजेक्ट स्विकारले नव्हते. आता सर्वांनाच तिच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. पण महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची कथा आणि नायकाबाबत अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. प्रेक्षकांसोबतच सिनेसृष्टीतसुध्दा सर्वांनाच तिच्या सिनेमाची उत्सुकता होती. त्यामुळे तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांवर कसा भुरळ पाडतो हे पाहावं लागेल.