काळ जरी बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हंटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा ज्याच्यामुळे नवरी मुलीच्या वडिलांच्या जीवाला घोर लागतो, मानपान- नातेवाईकांची पसंती यांच्या अनुषंगाने विचार करुन आपण कुठे कमी पडू नये याचा पुरेपूर प्रयत्न मुलीच्या वडिलांचा चालू असतो. बस्त्याच्या दरम्यान काहीही घडू शकते, जुळलेले लग्न मोडू ही शकते इतका नाजूक तो क्षण असतो. बस्त्याच्या निमित्ताने अशीच एक भावूक पण मजेदार गोष्ट 'बस्ता' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या सिनेमात हुंडा देणं आणि घेणं हे कायद्याने गुन्हा आहे, याचा संदेश देण्यात आला आहे. हीच शिकवण या सिनेमाद्वारे देण्यासाठी सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावे पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे. ही पाहुण्या कलाकाराची भूमिका लहान असली तरी लक्षवेधी ठरतेय.
. एका लग्नाच्या बस्त्यानिमित्त घडणारी गोष्ट ‘बस्ता’ ह्या सिनेमात सायली संजीव, सुहास पळशीकर, अक्षय टांकसाळे, अरबाज शेख, पार्थ भालेराव, शुभांगी गोखले आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
29 जानेवारीपासून ‘बस्ता’ हा सिनेमा झीप्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला आला आहे.