अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण ही निवृत्ती त्यांच्या अभिनय क्षेत्रातली नसून त्यांच्या संस्थेतून आहे. Quest नामक त्यांच्या संस्थेतून अतुल कुलकर्णी निवृत्ती घेत असल्याचं सोशल मिडीयावर सांगितलं आहे.
या पोस्टमध्ये अतुल कुलकर्णी लिहीतात की, "१ फेब्रुवारी २०२१ ला मी QUEST ह्या आमच्या संस्थेमधून निवृत्त होतो आहे… १ जानेवारी २००७ ला आम्ही काही मंडळींनी एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूनं QUEST ही संस्था स्थापन केली."
याशिवाय ‘सिग्मॉइड कर्व्ह’ सिद्धांताचा उल्लेख करत या सिद्धांतावर त्यांचा विश्वास असल्याचं ते या पोस्टमध्ये लिहीतात. याशिवाय ते वानप्रस्थाकडे प्रवास सुरु केल्याचही सांगतात. ते या पोस्टमध्ये पुढे लिहीतात की, "सध्या मी हळूहळू माझ्या आयुष्याच्या ‘वानप्रस्था’कडे प्रवास सुरू केला आहे सामाजिक/सार्वजनिक क्षेत्रात तर ‘अधिकारा’च्या जागेवरून निवृत्तीचं महत्व अनन्यसाधारण आहे.पण केवळ तितकंच नाही. माझ्या वैयक्तिक आणि इतर सामाजिक जबाबदाऱ्या कमी करणं, माझ्या अभिनयाच्याच क्षेत्रात राहून पण काही वेगळं करून पाहणं, काही जुनं विसरणं, काही नवीन शिकणं, नवीन प्रदेश/परिसर धुंडाळणं, आत्ताचा कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्नं करणं असं बरंच काही त्यात आहे."
तेव्हा अभिनय क्षेत्रात आणखी काही वेगळं करु पाहण्याविषयीही अतुल कुलकर्णी या पोस्टमध्ये सांगतात.