रामदास पाध्ये हे नाव तर मनोरंजन विश्वात सर्वश्रूत आहे. हेच प्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि मुलगा सत्यजित पाध्ये यांनी नुकताच एक खराखुरा वाटणारा मुखवटा बनवला आहे. हा मुखवटा एका कोल्ह्याचा आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेसाठी हा मुखवटा तयार करण्यात आला आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेसाठी तयार केलेला हा मुखवटा कसा तयार करण्यात आला याविषयीचा व्हिडीओ सत्यजित पाध्ये यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे.
ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "दख्ख्नचा राजा जोतिबा ह्या मालिकेसाठी आम्ही(रामदास पाध्ये व सत्यजित पाध्ये ह्यांनी) "कोल्हासूर" नावाचा खराखुरा दिसणारा कोल्हयाचा मुखवटा बनवला आहे. आमच्या टीम ने म्हणजे मोलडर्स, पेंटर्स व टॅक्सीडरमिस्ट ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा मुखवटा बनवला आहे."
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लुडो या सिनेमासाठीही या बाप-लेकाच्या सुप्रसिद्ध पाध्ये जोडीने थ्रीडी स्कॅनिंग आणि थ्रीडी प्रिंटींगच्या मदतीने हुबेहुब आदित्य रॉय कपूर सारखा दिसणारा बाहुला तयार केला होता. ही एखाद्या बॉलिवुड कलाकाराची भारतातील पहिली बाहुली ठरली.