'सैराट' या प्रसिद्ध सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाशची अजून सैराटचा परश्या म्हणून ओळख आहे. मात्र त्यानंतरही आकाशने विविध कामं करून त्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवली. आणि आता आकाश पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे ते एका वेबसिरीजच्या माध्यमातून.
'1962 : दि वॉर इन दि हिल्स' या सिरीजमध्ये आकाश झळकणार आहे. नुकताच या सिरीजमधील त्याचा लुकही रिव्हील करण्यात आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय देओल आणि सुमीत व्यास हे कलाकारही दिसतील. ही सिरीज वास्तविक घटनांमधून प्रेरित आहे. या सिरीजमध्ये कशाप्रकारे 125 भारतीय सैनिक 3000 चीनी सैनिकांविरुद्ध लढले ही कथा देखील दाखवण्यात येणार आहे. यातच एका सैनिकाची भूमिका आकाश साकारणार आहे. आकाश ठोसर या सिरीजमध्ये किशनची भूमिका साकारत आहे. नुकताच या सिरीजमधील आकाशचा लुक समोर आला आहे.
यावेळी त्याने लष्करामध्ये निवड होण्यासाठी परिक्षा देखील दिली होती हे सांगितलं. या सिरीजविषयी सांगताना आकाश म्हणतो की, "''सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्स' माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्ये जाण्याचे स्वप्न होते आणि मी चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वी लष्करामध्ये निवड होण्यासाठी दोनदा परिक्षा देखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमध्ये देखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्या देशाच्या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामध्ये असते.''
तो पुढे म्हणाला की, ''पहिल्यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्तविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्ये सैन्याचा पोशाख परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. मला अत्यंत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्याचाच भाग आहे आणि मी स्वत:कडे त्याच दृष्टिने पाहिन.''
ही सिरीज येत्या 26 फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.