आता तुम्ही म्हणाल, ‘सविता दामोदर परांजपे’ आणि जॉन अब्राहम हे काय नवीन प्रकरण आहे. जॉन आणि मराठी हे कुठलं कनेक्शन, हे कुठलंही प्रकरण किंवा कनेक्नशन नसून या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती जॉनने केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होत असल्याची माहिती त्याने नुकतीच आपल्या ट्विटर हॅंण्डलवरुन दिली.
‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चा निर्माता म्हणून जॉन खुप उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे तो प्रथमच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.
‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर आधारित सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी करत आहेत. गुणी अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल या सिनेमाद्वारे पदार्पण करत आहे. तसंच अभिनेता राकेश बापटसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून निलेश मोहरीर आणि अमित राज यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटातील ‘सविता’ या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेद्वारे तृप्ती तोरडमल प्रेक्षकांसमोर येत आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी ही भूमिका साकरली होती. त्यामुळे, सिनेमात सविता साकारण्याचे मोठे आव्हान पदार्पणातच तृप्तीवर आहे.
सर्वांनाच जॉन अब्राहमच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाची भरपूर उत्सुकता आहे. येत्या 31 ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.