प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेता दिग्पाल लांजेकरला हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र यात काहीही तथ्य नसून या निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. दिग्पालच्या हार्ट अटॅकच्या बातमीनं अनेकांना धक्का बसला होता. मात्र त्या अफवा असल्याचं त्याच्या निकटवर्तीयांनी समोर आणलं आहे.
दिग्पालला अति ताणामुळे त्रास झाला आणि त्यानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार दिग्पाल आणि सहकारी सुश्रुत पुण्याहून मुंबईला चालले होते. त्यावेळी दिग्पालला वाटेत अस्वस्थ वाटू लागले. एवढच नाही तर दिग्पाल बेशुद्धही पडला होता. त्यानंतर त्याला पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं दिग्पालच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
दिग्पाल सध्या 'पावनखिंड' या त्याच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. आणि यादरम्यान त्याला अति ताणामुळे त्रास झाल्याचं समोर आलं आहे. दिग्पालने 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या प्रसिद्ध सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय 'जंगजौहर' या सिनेमाचं आता शिर्षक बदलून 'पावनखिंड' असं नाव ठेवण्यात आलं असून हा सिनेमा 10 जूनला प्रदर्शित होणार आहे.