'हंसता हुआ नूरानी चेहरा' हे गाणं आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. आजही या गाण्याची जादू कायम आहे. मात्र या गाण्यात झळकलेल्या अभिनेत्रींपैकी एक चेहरा म्हणजे जीवनकला केळकर यांचा. जीवनकला यांची अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख होती. याशिवाय त्या प्रसिद्ध पटकथा लेखक राम केळकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मनीषा केळकरची आई आहेत. आता पुन्हा 47 वर्षांनी त्या कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. 'डान्स दिवाने' या डान्स रिएलिटी कार्यक्रमात त्यांना मंचावर बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जीवनकला बऱ्याच वर्षांनी वयाच्या 77 वर्षी 'हंसता हुआ नूरानी चेहरा' या गाण्यावर थिरकल्या आहेत.
जीवनकला यांचं नृत्य पाहुन या कार्यक्रमाची परिक्षक सुपरस्टार माधुरी दीक्षितही अवाक झाली आहे. यासह तेथील प्रेक्षकही थक्क झाले. आजही जीवनकला यांनी त्यांच्या नृत्याची आवड कायम जपून ठेवली असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. आणि त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं. माधुरी तर जीवनकला यांचा डान्स पाहुन आश्चर्यचकीत झाली आणि माधुरीने 'रेशमाच्या रेघांनी' हे गाणंही त्यांच्यासाठी गायलं.
वयाच्या सहाव्या वर्षी जीवनकला यांनी सिनेविश्वात पाऊल ठेवलं होतं. सूर्यकांत यांच्या 'अखेर जमलं' हा त्यांचा पहिला सिनेमा. 'हंसता हुआ नूरानी चेहरा' या गाण्यासह 'रेशमाच्या रेघांनी', 'अखेरचा तुला दंडवत', 'जिथे सागरा धरणी मिळते' ही प्रसिद्ध गाणीही जीवनकला यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली आहेत. 'एक राज' मध्ये त्यांनी प्राण यांच्यासोबत काम केलेलं आहे. याशिवाय शम्मी कपूर, हेलन, मेहमूद या कलाकारांसोबतही जीवनकला अनेक प्रसिद्ध सिनेमा आणि गाण्यांमध्ये झळकल्या आहेत. हिंदी, मराठीसह त्या तामिळ सिनेमातही झळकल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात जीवनकला यांनी डान्स केला होता. तो डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. आणि म्हणूनच जीवनकला यांच्याविषयी चौकशी करण्यात आली. त्यानंतर 'डान्स दिवाने 3' कार्यक्रमात त्यांना बोलावण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेला सन्मान आणि कौतुकाने जीवनकला आणि त्यांची मुलगी, अभिनेत्री मनीषा केळकर यांना प्रचंड आनंद झाला आहे.