मराठी सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला नेहमीच भुरळ पाडलीय. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘संजू’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणा-या राजकुमार हिरानी यांनी अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या चुंबक या मराठी सिनेमाचे कौतुक केले आहे.
एका व्हिडीयोद्वारे आणि ट्विटरवर चुंबकचे कौतुक करताना राजकुमार हिरानी म्हणाले, मी नुकताच एक सिनेमा पाहिला त्याचं नाव आहे, चुंबक. एक साधी सरळ गोष्ट मनाला फार भावली. ब-याच वर्षानंतर असा सिनेमा पाहायला मिळाला. संदीप मोदींनी केलेले सिनेमाचं दिग्दर्शन खुपच चांगल्या पध्दतीने करण्यात आला. आमच्या सिनेमांचे गीतलेखन करणारे आणि आमचे मित्र स्वानंद किरकिरे यांनी या सिनेमात प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे.सर्वांनी हा सिनेमा येत्या शुक्रवारी नक्की पाहा.”
तसंच ते पुढे म्हणाले, “साहिल जाधव आणि संग्राम देसाई या नवोदितांनी कलाकारांनी कौतुकास्पद काम केले आहे. या सिनेमाची निर्मिती करणा-या नरेन कुमार आणि अक्षय कुमार यांना माझा सलाम,.”
72 मैल –एक प्रवास’ सिनेमानंतर अक्षय ‘चुंबक’सह मराठी प्रेक्षकांसमोर एक हद्यस्पर्शी आणि हटके विषय सादर करत आहे. गीतकार-संगीतकार आणि अभिनेता स्वानंद किरकिरेंची यात प्रमुख भूमिकेत आहे.
एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
येत्या 27 जुलैला ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.