‘नकळत सारे घडले’ या स्टार प्रवाहवरील मालितेकत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रसिध्द गायक-गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे हे आगामी 'चुंबक' या मराठी सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहेत. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या या मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंद यांनी या कार्यक्रमात एका पाहुण्या कलाकारची छोटीशी व्यक्तिरेखा साकारली.
'चुंबक' सिनेमात स्वानंद 'प्रसन्ना' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच 'प्रसन्ना' आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही रंगतात. झटपट पैसा कमावण्याच्या नादात कसं नुकसान होतं याचे धडेच 'प्रसन्ना' प्रिन्स दादाला देतो. त्यामुळे प्रिन्स दादाचे डोळेच उघडतात. आयुष्यात खुप मोठा धडा तो शिकतो. हा 'प्रसन्ना' म्हणजे गीतकार-गायक आणि अभिनेते स्वानंद किरकिरे.आपल्या अभिनयानं स्वानंद किरकिरे यांनी ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील हा प्रसंग फुलवला आहे. त्यामुळे हा भाग नक्कीच प्रेक्षकांना खुप भावणार आहे.
एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे 'चुंबक'. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
येत्या 27 जुलैला ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.