होळीचा सण हा उत्साहाचा आणि आनंदाचा असा सण आहे. या सणात विविध रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो. या रंगाच्या उधळणीत होळीची विविध गाणी आणखी उत्साह भरणारी असतात. यात काही प्रसिद्ध मराठी गाणी अशी आहेत जी थिरकायला भाग पाडतात.
आला होळीचा सण लय भारी :
प्रत्येक होळीच्या सणात गेल्या काही वर्षांपासून एक गाणं कायम कानावर पडतं. ते गाणं म्हणजे ‘लय भारी’ या रितेश देशमुखच्या चित्रपटातील ‘आला होळीचा सण लय भारी’ हे गाणं. या गाण्यात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री राधिका आपटे थिरकताना दिसतात. गुरु ठाकूर यांचे गीत आणि अजय-अतुल यांचं संगीत या गाण्याला लाभलय. गायक स्वप्निल बांदोडकर आणि गायिका योगिता गोडबोले यांनी हे गाणं गायलय. गेल्या काही वर्षांपासून होळीच्या सणाला हे गाणं हमखास ऐकायला मिळतं आणि या गाण्यावर ठेका धरला जातो. रितेश देशमुख आणि राधिका आपटेचा परफॉर्मन्स असलेल्या या गाण्यात रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा खास कॅमियो आहे.
धुवून टाक :
अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी सिनेमांमधील होळीची गाणी चांगलीच गाजली. उधळुया रंग म्हणत 'माऊली' या त्याच्या चित्रपटात 'धुवून टाक' हे होळीचं खास गाणं आहे. या गाण्याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या गाण्यात रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख आहेत.
रितेश आणि जेनेलियाची गोड केमिस्ट्री आणि त्यांचा जबरदस्त परफॉर्मन्स या गाण्यात पाहायला मिळतो. या गाण्याला अजय-अतुल यांचं संगीत आणि गीत असल्यानं हे गाणं ऐकायला मजा येते. होळीच्या सणात हे गाणं थिरकायला लावतं. अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे.
चला होळीच्या खेळाला रंग :
‘चष्मे बहाद्दर’ या मराठी चित्रपटातील ‘चला होळीच्या खेळाला रंग रंग’ हे गाणं प्रत्येक होळीत ऐकायलं मिळत. अभिनेता संजय नार्वेकर आणि दिपाली सय्यद यांच्यावर हे गाणं चित्रीत आहे. विजय पाटकर दिग्दर्शित या चित्रपटातील या होळीच्या गाण्याला संगीत जितेंद्र कुलकर्णी आणि बाळ नाईक यांनी दिलं आहे. श्रीरंग गोडबोले यांचे गीत आहेत. हे गाणंही होळीच्या रंगात रंग भरत या सणाचा आनंद द्विगुणीत करते.
होळीचा डंका :
'विजय असो' या मराठी चित्रपटातील 'होळीचा डंका' गाणं हे होळी स्पेशल गाणं आहे. होळीच्या सणात हे गाणं देखील उत्साह भरणारं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड या गाण्यात झळकत आहेत.
ही आणि इतर बरीच होळीच्या सणाची गाणी मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. होळीच्या सणात ही गाणी वाजवून, एकमेकांवर रंगांची उधळण करत हा सण साजरा केला जातो.