अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा वेल डन बेबी हा सिनेमा कधी प्रदर्शित होतोय याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकताच या मोस्टअव्हेटेड सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आदित्य आणि मीरा (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते. आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे.
वेल डन बेबी प्रदर्शित होत असल्याची नुकतीच झालेली घोषणा आणि त्यापाठोपाठ आलेला ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसने सादर केला आहे. भारतातील प्राइम सदस्यांना 9 एप्रिल 2021 पासून हा सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे.