‘वेल डन बेबी’ या मराठी सिनेमातून अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अमृता खानविलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर नुकतच सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.
या सिनेमातील कौटुंबिक नाट्याचा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. या साऊंड ट्रॅकमधील ‘आई-बाबा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या सुमधुर अल्बमविषयी बोलताना अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला की, “संगीत हा आमच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला सखोल असा अर्थ आहे. प्रसंगांना साजेशा असलेल्या या गाण्यांमुळे चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. रोहन-रोहन ही मराठी सिने क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी ‘वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे.”
‘आई-बाबा’ या प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्याला सिनेमात ओटी भरण्याचा कार्यक्रम पाहायला मिळतोय. सिनेमातील दाम्पत्याला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या जीवनातील हा गोड भाग या गाण्यातून चित्रीत करण्यात आलाय. हे गाणं गायक रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंदच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.
वेल डन बेबी’ हा सिनेमा प्रियांका तन्वर यांनी दिग्दर्शित केला आहे. मर्मबंधा गव्हाणे या सिनेमाच्या लेखिका आहे. तर पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 9 एप्रिलपासून हा सिनेमा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.