अभिनेता भूषण प्रधानने मालिका, सिनेमे, नाटक, रिएलिटी शो, जाहीरात, वेबसिरीज अशा मनोरंजन विश्वातील विविध माध्यमातून काम केले आहे. भूषणने टेलिव्हीजन विश्वातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर त्याने फिटनेस आणि अभिनयाच्या जोरावर विविध भूमिका साकारल्या. मात्र या प्रवासात भूषण आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येत असल्याच्या चर्चा आहे. या चर्चा सुरु झाल्या त्याच्या एका पोस्टमुळे.
भूषणने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. तो लिहीतो की, "काहीतरी रंजक गोष्टीची तयारी करत आहे. अतिशय आव्हानात्मक. असं माध्यम ज्यापासून मी जवळपास 8 वर्षे लांब होतो. आपण घरी असताना लवकरच भेटू."
जवळपास आठ वर्षांपूर्वी 'पिंजरा' या मालिकेनंतर भूषणने सिनेमा विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर विविध सिनेमांमधून भूषण भेटीला आला. तेव्हा भूषणच्या पोस्टनुसार तो पुन्हा मालिका विश्वात म्हणजेच टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण करत असल्याची हिंट त्याने दिली असल्याचं पाहायला मिळतय. मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र ही बातमी जर खरी असेल तर भूषणच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच असेल. तेव्हा पुन्हा भूषणला टेलिव्हिजन विश्वात पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
आत्तापर्यंत भूषणने 'घे भरारी', 'चार चौघी', 'कुंकू', 'ओळख', 'पिंजरा' या मालिकांमधून काम केलं आहे. त्यानंतर विविध सिनेमा, नाटक आणि वेबसिरीजमध्ये भूषणने विविध भूमिका साकारल्या आहेत. 'पिंजरा' ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेने भूषणला टेलिव्हिजन विश्वात एक वेगळी ओळख मिळाली होती. या मालिकेत भूषण अभिनेत्री संस्कृती बालगुडेसोबत झळकला होता. अभिनयासोबतच भूषणचा उत्तम फिटनेस कायम लक्षवेधी ठरतो. 2019मध्ये भूषणला 'मोस्ट डिझायरेबल मेन'चं टायटल मिळालं होतं.