देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढताना दिसतोय. या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना पॉजिटिव रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्याची ही परिस्थिती बघता मनोरंजन विश्वातही काही बदल होताना दिसत आहेत. यातच एका आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
निखिल महाजनचं दिग्दर्शन आणि जितेंद्र जोशीची निर्मिती असलेल्या गोदावरी या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलय. येत्या 30 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता याचं प्रदर्शन आता पुढे नेण्याचा निर्णय या चित्रपटाच्या टीमने घेतला आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर करणार असल्याचही सांगीतलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे.
जितेंद्र जोशीने या पोस्टमध्ये लिहीलय की, "करोनाचा प्रादुर्भाव आपल्या भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात सुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत . शेकडो लोकांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि मेहनतीने बनलेला 'गोदावरी' हा आपला चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 30 एप्रिल 2021 रोजी आपल्या सर्वांच्या भेटीस आम्ही चित्रपटगृहांमध्ये घेऊन येणार होतो, कारण ह्या चित्रपटाचा अस्सल आनंद हा मोठ्या पडद्यावरच पाहून घेता येईल, अशी आमची खात्री होती आणि आहेच. परंतू बदलती परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सामोपचाराने 'गोदावरी'चे प्रदर्शन तूर्तास पुढे नेण्याचा निर्णय घेत आहोत. परिस्थतीमध्ये सुधारणा होऊन सर्व काही आलबेल होताच आम्ही प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच जाहीर करू.तोवर, आपण स्वतःची आणि आपल्या आप्त स्वकियांची काळजी घ्यावी व अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आणि सर्वांच्या आरोग्य सुरक्षेकरिता मास्क नक्की वापरावेत ही कळकळीची विनंती.खळखळ वाहणारी तुमची-आमची 'गोदावरी' लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. फक्त चित्रपट गृहांमध्येच! आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या! जय महाराष्ट्र!!! जय हिंद!!!!"
हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याची इच्छा या टीमची असल्याने लवकरच प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणाही करण्यात येईल. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता.या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशीसह, गौरी नलावडे, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, सखी गोखले, संजय मोने हे कलाकार आहेत.