देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल अनेकदा लिहिलं बोललं गेलं आहे. पण संयुक्त महाराष्ट्राची देणगी आपल्याला इतकी सहज मिळालेली नाही. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना प्राण अर्पावे लागले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास आता वेबसिरीजच्या रुपात समोर येत आहे. झी5च्या ‘हुतात्मा’ या वेबसिरीजमधून हा इतिहास अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मीना देशपांडेंच्या ‘हुतात्मा’ कादंबरीवर ही वेबसिरीज आधारित आहे. जयप्रद देसाईंनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=zDBInIe5ATk
स्वातंत्र्यानंतर भाषावर प्रांतरचना करण्यामागे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होता. हा हाणून पाडण्यासाठी एस. एम.जोशी ,काॅ. श्रीपाद अमृत डांगे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या प्रमुख नेत्यांच्या अधिपत्याखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. अशात त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबाराचे आदेश दिले. त्या आंदोलनात १०५ जणांचा बळी गेला. याच एकुण घटनेचा थरार या वेबसिरीत दिसेल. या वेबसिरीजमध्ये अंजली पाटील, सचिन खेडेकर, वैभव तत्ववादी, आनंद इंगळे, अभय महाजन, अश्विनी काळसेकर हे कलाकार आहेत. वडिलांच्या चळवळीत झालेल्या हत्येचा बदला घेणा-या विद्युत या तरुणीची ही गोष्ट आहे.