बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक बोनी कपूर 2005 मधील विनोदी सुपरहीट सिनेमा ‘नो एन्ट्री’चा सिक्वेल बनवण्याची तयारी करत आहेत. या सिनेमात सलमान खानने प्रमुख भूमिका साकारुन धम्माल उडवली होती. तसंच त्याच्यासोबत या सिनेमात अनिल कपूर आणि फरदिन खान यांच्यासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका होत्या व त्यांनीसुध्दा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. महत्त्वाचं म्हणजे आता या सिक्वेलमध्ये सलमान खानला कास्ट करण्यात येणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेलच, सुपरस्टार सलमान खान नाही तर मग कोण त्याची जागा घेणार?
चला तर या मोठ्या बातमीबद्दल जाणून घेऊयात, नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने सांगितले होते, माझा सध्या ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलमध्ये काम करण्याचा कोणताच विचार नाही. यामुळेच बोनी कपूर यांचे पुत्रप्रेम जागे झाले आहे. ते आपल्या मुलाला अर्जुनलाच या भूमिकेसाठी कास्ट करत आहेत. या सिक्वेलमध्ये सलमानच्या जागी आता अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एका वेबसाईटच्या वृत्तानुसार सध्यातरी बोनी कपूर ‘नो एन्ट्री सिक्वेल’च्या कथेवर काम करत आहेत. तसंच कथेनुसार बोनी कपूर यांना नव्या कलाकारांना कास्ट करण्याचीसुध्दा गरज भासेल. पण सलमानने साकारलेली प्रेम ही व्यक्तिरेखा आता अर्जुन कपूर साकारेल.
सध्या बोनी कपूर अजय देवगणसोबत आपल्या एका सिनेमात व्यस्त आहेत. त्यानंतर ते ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलवर काम सुरु करतील. तर अर्जुन कपूरने नुकतीच नमस्ते लंडनची शुटींग पूर्ण केली आहे.