By  
on  

अभिनेता आरोह वेलणकरने प्लाझ्मा डोनेशनसाठी घेतला पुढाकार 

सध्या देशभरात कोरोनाने थैमाल घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मात्र अशा परिस्थितीतही अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही जनसंपर्क आणि सोशल मिडीयाच्या सहाय्याने विविध पातळीवर मदत करण्याचा प्रयत्नात आहेत.
अभिनेता आरोह वेलणकरने सध्या प्लाझ्मा दान करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचं आवाहन आरोह करत आहे. आरोह हा पुणे शहरातील प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात पाठपुरावा करतोय.

याविषयी पिपींगमून मराठीने आरोहशी बातचीत केली आहे. यावेळी आरोहने डोनर्स मोठ्या संख्येने यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगीतलय. आरोह सांगतो की, “वंदे मातरम संघटना, मित्र रोहीत सोनावणे आणि एक कर्नल यांच्या सहाय्याने डोनर्स जोडणे, हॉस्पिटलमधून डोनर्सची यादी काढणे या माध्यमातून हे काम केले जात आहेत. याशिवाय सोशल मिडीयाच्या सहाय्याने जे लीड्स येत आहेत त्याची माहिती घेतोय. यात चार डोनर्सना नुकतच लॅबमध्ये पाठवलं आहे. त्यांची पात्रताही पडताळून घेतली जात आहेत.”

आरोह हा पुण्यात राहतो. पुणे शहरात त्याचा जनसंपर्कही चांगला आहे, शिवाय सोशल मिडीयावरही त्याचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत. याचा वापर करून लोकांना जोडून देऊन तो मदत करतोय. मागील काही दिवसांपासून लोकाना बेड मिळवून देणं, इंजेक्शन उपलब्ध करुन देणं यासाठीही त्याने स्वत: पुढाकार घेतला आहे.   सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही मदत कशी केली जात आहे याविषयी आरोह सांगतो की, “सोशल मिडीयावरुन अनेक जण मला संपर्क करत आहेत त्यांना मी मार्गदर्शन करुन योग्य ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना प्लाझ्मा दान करण्याविषयी प्रक्रिया ही माहित नाहीत तेही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मिडीयावर पोस्ट टाकून त्याचा फॉलोअप घेणही तितकच महत्त्वाचं आहे. लीड्स जनरेट करण्यात सोशल मिडीयाचा वापर होतोय पण फक्त पोस्ट करुन, शेयर करुन उपयोग नाही तर त्यातही फॉलोअप घेणं हे तितकच महत्त्वाचं आहे.”

 यात आणखी कलाकारांना जोडण्याचा आरोहचा विचार आहे, ज्याने मोठ्यासंख्येने प्लाझ्मा दानविषयी जागरुकता निर्माण होईल. यासाठी आरोह सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही लोकांना प्लाझ्मा डोनेशनसाठी आवाहन करतोय. आणि योग्य ती मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
पुढे आरोह म्हणतो की, “जर तुम्हाला कोविड होऊन गेला असेल आणि तुम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी पात्र असाल तर प्लाझ्मा डोनेट करा. याविषयी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे. अनेक असेही रुग्ण आहेत जे कोविड मधून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांना डॉक्टरांचं कन्सल्टेशन मिळत नाही. त्यासाठी काही कन्सल्टेशन मदतही करण्यात आली आहे.”

Recommended

PeepingMoon Exclusive