By  
on  

“माणसाचा जीव वाचणं यापेक्षा मोठं समाधान नाही”, सोशल मिडीयाचा वापर करून अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा मदतीचा हात

सध्याच्या कोरोनाग्रस्त काळात विविध क्षेत्रातून अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात सोशल मिडीयाचा वापर करून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही यात पुढाकार घेत आहेत. सोशल मिडीयाचा वापर करत अनेकांना मदत करण्यासाठी मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितही तिच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून कोरोना रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेजस्विनीच्या या कार्याची दखल घेत पिपींगमून मराठीने तेजस्विनीशी बातचीत केली आहे. सध्याच्या कोरोना काळात सोशल मिडीयाचा योग्य वापर करून तेजस्विनीने अनेकांना कोरोनासाठी लागणारे महागडे इंजेक्शनही उपलब्ध करून दिले ज्याने जवळपास चार लोकांचे प्राण बचावले आहेत. याविषयी विचारले असता तेजस्विनी म्हणते की, “माणसाचा जीव वाचला याच्यापेक्षा मोठा आनंदच असू शकत नाही  किंवा त्यापेक्षा मोठं समाधान कोणतं असू शकत नाही. हे समाधान मला सध्या सातत्याने मिळतय आणि जे करता येतय ते प्रामाणीकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. 

नुकतच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन तेजस्विनीने रक्तदान केलय. आधीपासूनच समाज कार्यात सक्रिय असलेल्या तेजस्विनीने पहिल्यांदाच तिच्या कार्याविषयीची पोस्ट केली आहे. त्याचं कारण तिने पिपींगमून मराठीसोबत बोलताना सांगीतलं. ती सांगते की, “मी याआधी पासूनच समाज कार्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. पण मी कधीच ते समोर आणत नाही किंवा लोकांना दाखवत नाही आणि त्याचा गाजावाजा मी कधीच केला नाही. पण आता मला ते करावं लागलय कारण सध्या डिजीटल युग आहे. एखादा जरी माणूस पुढे आला तर अनेकांचा जीव वाचतो. या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी मला जमेल तितकी मदत मी करणार आहे. पण या काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी मी अशा गोष्टी पोस्ट करत जाईल आणि लोकांपर्यंत पोहोचवत जाईल. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पुढे सरसावणं आणि माध्यमाचा चांगला वापर करणं गरजेचं आहे..”
नुकतच रक्तदान केल्यानंतर तेजस्विनीला सतत तिच्या बाबांची आठवण येत आहे. बाबांनी दिलेल्या शिकवणीचा योग्य वापर करत असल्याचं ती सांगते, ”खूप वर्ष हिमोग्लोबिन कमी असल्याने मला रक्तदान करता येत नव्हते. माझ्या बाबांनी अनेक वर्षांपूर्वी मला सांगीतलं होतं की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. ते म्हटले होते की तू रक्तदान कधीही कर पण नक्की कर. मला ते आता करता आलं त्यामुळे आता सातत्याने माझ्या बाबांची आठवण येतेय. माझ्या बाबांच म्हणणं इतकं पटतं की म्हणूनच मी त्याचा सुवर्णमध्य गाठला आता. की काही गोष्टी करायच्या तर झाकल्या मुठीने करायच्या आणि काही गोष्टी करायच्या ज्याच्यामुळे लोकं पुढे येऊ शकतील. मुख्य म्हणजे सध्याच्या परिस्थितीत पुढे येणं आणि सोशल मिडीयाचं प्लॅटफॉर्म वापरणं खूप. महत्त्वाचं आहे.”

याशिवाय अभिनय क्षेत्रात काम करत असताना कलाकार हे कॅमेऱ्यामागेही सतत अभिनय करतात असं लोकांना वाटणं ही कलाकाराची शोकांतीका असल्याचं तेजस्विनी सांगते. “आम्हा कलाकारांची ही एक अडचण आहे की आम्ही कितीही काही केलं तरी लोकांना ते अभिनयच वाटतं. ही खरतर कलाकाराची शोकांतीका आहे. कलाकार हा संवदेनशीलच असतो, त्याला माहिती असतं की कलाकार म्हणून तो समाजाचं देणं लागतो. ”

Recommended

PeepingMoon Exclusive