सध्या राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असून पुन्हा राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. मागील वर्षाप्रमाणे आता यावर्षीही कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी करण्यात आलीय. या सगळ्यात सोशल मिडीयावर नकारात्मक आणि सकारात्मक असा संमीश्र सूर पाहायला मिळतोय. एकीकडे ट्रोलर्स नकारात्मकता पसरवत आहेत. तर विविध क्षेत्रातील मंडळी सोशल मिडीयाचा वापर करून लोकांना मदतीचा हात देत आहेत.
यातच नेहमी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेली अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचा हेमांगीचा प्रयत्न दिसतोय. हेमांगी या पोस्टमध्ये लिहीते की, "दर 10 मिनिटांनी ambulance चे येणारे आवाज कमी झालेत! मुंबईची परिस्थिती सुधारतेय. सकारात्मक! अजून थोडा संयम मंडळी! रुग्णालय, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, फ्रन्टलाईन वर्क्स सगळ्यांना अधिक शक्ती."
गेले काही दिवस कोरोनामुळे कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र संचारबंदी, लॉकडाऊनमुळे यात बदल जाणवत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच सध्या परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र हेमांगीला दिसतय. आणखी संयम पाळून परिस्थिती सुधरवता येण्याचा सकारात्मक संदेश हेमांगी तिच्या या पोस्टमधून देत आहे.