प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं मागील वर्षी निधन झालं. लिव्हर सिरोसिस या आजाराने त्यांना ग्रासले होते त्यासाठी त्यांच्यावर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र या आजाराशी त्यांची झुंज संपली आणि मागील वर्षी 17 ऑगस्टला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी, मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली होती.
निशिकांत यांचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक संजय जाधव अजूनही या दु:खातून सावरले नाहीत. निशिकांत यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मिडीयावर कोणतीच पोस्ट केली नव्हती. मात्र नुकतच निशिकांत यांच्यासोबतच्या काही आठवणीचे क्षण त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
संजय जाधव या पोस्टमध्ये लिहीतात की, "तू गेल्यानंतर मी सोशल मिडीयावर काहीच लिहीलं नव्हत, कारण मन नव्हतं. काय लिहीणआर ? आर आय पी निशी ? नाही रे, पण वासूने आज मला हे फोटो पाठवले आणि वाटलं की हे शेयर कराव. आपल्याला पार्टी करण्यासाठी कोणतच निमित्त लागायचं नाही. सिनेमा सुरु झाला, चांगला शॉट घेतला, वाईट काम केलं, सिनेमा संपला, पहिली कॉपी निघाली, अवॉर्ड मिळाला किंवा नाही मिळाला, आपण नेहमी पार्टी केली. कोण चांगला फिल्ममेकर आहे ? तू की मी.. यावर अनेकदा आपण पार्टी करताना चर्चा केली आहे. आपल्यात नेहमी मतभेदही असायचे, आपण मुद्दे एकमेकांसमोर मांडायचो पण आपल्याकडे वेळ होता, सोनेरी क्षण.. मला खात्री आहे की अमीत पवार आणि तू नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत असणार, नक्कीच हातात ग्लास घेऊन.. चियर्स निशी.."
या पोस्टमध्ये संजय जाधव यांनी एका पार्टीतले निशिकांत कामत यांच्यासोबतचे काही फोटो शेयर केले आहेत.