काही नाती ही वर्षोनूवर्षे प्रेमाच्या बंधनात बांधलेली असतात. असं अतूट प्रेमाचं नातं आहे अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे यांचं. बालवयात असताना या दोघांमध्ये प्रेम जुळलं होतं. याच प्रेमाच्या नात्याला आता तब्बल 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सुबोध आणि मंजिरी शाळेत असताना त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांचं प्रेम जुळलं होतं. त्यावेळी मंजिरी आठवी इयत्तेत होती तर सुबोध दहावी इयत्तेत. हे प्रेमाचं नातं फुलत गेलं आणि नंतर पुढे जाऊन दोघांनी लग्नही केलं. मात्र ज्यावेळी या नात्याला सुरुवात झाली तेव्हा सुबोधने मंजिरीजवळ प्रेमाची कबुली दिली होती. त्याच गोष्टीला आता 30 वर्षे पूर्ण झाले असून सुबोध आणि मंजिरी या एनिवर्सरीच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहेत. नुकतच दोघांनी सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट केली आहे.
सुबोध लिहीतो की, "आजच्या दिवशी तिने मला 'हो" म्हणलं,मंजिरी.. खूप खूप प्रेम"
तर मंजिरी पोस्टमध्ये लिहीते की, "गुन्ह्यात भागीदार आहोत. एनिवर्सरी होय.. लग्नाची ? नाही.. 30 वर्षे प्रेम आणि वचनाची."
12 जुलै 2001 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. आता दोन मुलांसह त्यांचा सुखी संसार आहे.