6 मे, 2011 रोजी रुपेरी पडद्यावर संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्षात सादर करण्यात आला होता ते रवी जाधव दिग्दर्शित 'बालगंधर्व' या चित्रपटात. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात बाल गंधर्व यांची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सुबोध भावेने सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या आठवणी शेयर केल्या आहेत. या चित्रपटासाठी सुबोध भावेने 'गंधर्वगाथा' हे भा.द.खेर लिखित पुस्तक वाचलं होतं. हे पुस्तक वाचण्यापासून सुरु झालेला प्रवास हा 'बालगंधर्व' चित्रपटापर्यंत होता. या प्रवासात सुबोध भावेने वेगळा अनुभव घेतला. याचविषयी त्याने पोस्ट केली आहे.
या चित्रपटाच्या विविध फोटो पोस्ट करून सुबोध लिहीतो की, ""गंधर्वगाथा" हे भा.द.खेर लिखित पुस्तक पुस्तक वाचून सुरू झालेला प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटाद्वारे संपन्न झाला.६ मे २०११ रोजी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं, आज बालगंधर्व चित्रपटाचा १० वा वाढदिवस. संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला.त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो. झपाटल्यासारख काम करणं म्हणजे काय असतं ते या चित्रपटाच्या उत्तम टीम मुळे अनुभवास आलं.सअनेक कडू गोड प्रसंग या चित्रपटाने वाट्यास आले पण आयुष्यभर लक्षात राहील तो कादंबरी वाचल्यापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासातील आनंद हा अवर्णनीय आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट करावासा वाटला त्या "बालगंधर्व" आणि त्यांच्या समकालीन सर्व दिग्गजांना मनापासून अभिवादन आणि ज्यांच्या बरोबर हा प्रवास केला त्या माझ्या अतिशय लाडक्या टीम वर मनापासून प्रेम."
या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची तर मनं जिंकली होती शिवाय या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.
हा चित्रपट ज्यांना पुन्हा पाहायचा असेल किंवा ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचही सुबोध भावेने या पोस्टमध्ये सांगीतलय. या चित्रपट निर्मितीचा प्रवास या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय असेल एवढं नक्की.