सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे सोशल मिडीयासारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत केली जात आहे तर दुसरीकडे औषधांचा काळाबाजारही होत आहे. सध्या कोरोनासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. असं असतानाही सध्या इंजेक्शन, औषधांचा काळाबाजार अनेक ठिकाणी सुरु आहे. अशातच नागपुरातील एक घटना समोर आली आहे. यात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला चक्क रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी एसिडिटीचं इंजेक्शन टोचण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त किमतीला विकूनही त्याचा काळाबाजार केला जात आहे. अशा विविध घटना सध्या समोर येत आहेत.
यावर सोशल मिडीयावर रागाचा सूर उमटला आहे. अनेक कलाकारांना याबद्दल सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेता रितेश देशमुखलाही याविषयी कळल्यावर तो सोशल मिडीयावर व्यक्त झाला. रितेशने ही बातमी वाचल्यावर तो लिहीतो की, "औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे." असा काळाबाजर करणाऱ्यांना रस्त्यात मारलं पाहिजे असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.
कायम नकारात्मकता आणि ट्रोलिंगसाठी सोशल मिडीया चर्चेत असतो. मात्र सध्या कोरोना काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना मदतीसाठी होतोय. अनेक कोरोना रुग्णांच्या माहिती, त्यांची गरज याचा तपशील सोशल मिडीयावर शेयर करुन हवी ती मदत पुरवली जाते. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.