बालगंधर्व या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचा प्रवास, अनुभव या या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय होता. या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया ही दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ह्रदयाच्या जवळची आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या 10 व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी या चित्रपटाच्या आठवणी शेयर केल्या आहेत.
रवी यांनी तब्बल 20 ते 27 क्षणचित्रे पोस्ट करून या चित्रपटाच्या आठवणी सोशल मिडीयावर लिहून व्यक्त केल्या आहेत. ते लिहीतात की, "आज दहा वर्ष झाली ‘बालगंधर्व’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन. भोरच्या वाड्यामध्ये ३३ दिवस अखंड अहोरात्र काम करण्यासाठी साक्षात बालगंधर्वच आम्हा सर्व टिमला बळ देत होते असे अजूनही वाटते. हि कलाकृती साकारत असतानाचा प्रत्येक कडू गोड क्षण अजूनही आठवतो. सेट वरच्या गमती जमती, सेट ते हॅाटेल प्रवास, रात्री हॅाटेल मधील गाण्यांच्या महफीली, सेट वरचे टेन्शन… सर्वच या चित्रपटाने खूप काही दिले. नवे मित्र दिले, नवा दृष्टीकोण दिला, नवे बळ दिले. नवा आत्मविश्वास दिला. केवळ ही दहा वर्षच नाही तर पुढील अनेक दशके मराठी रंगभूमीवरचे हे काही सोनेरी क्षण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा अनूभवता येतील हे नक्की.असा अद्भूत विषय व तो साकारायला झटणारी अशी ब्रीलीयंट टिम पुन्हा पुन्हा मिळत नाही. या सर्व टिमला मनापासून नमन आणि प्रेम."
या चित्रपटातील बालगंधर्व यांच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावेने प्रचंड मेहनत घेतली होती. सुबोधच्या या प्रवासात सहभागी असलेले रवी जाधव यांनी त्याची ती मेहनत पाहिली होती. याचविषयी सांगणारा एक व्हिडीओ रवी यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे. ज्यात सुबोध भावे हा गायक श्री. आनंद भाटे यांच्याकडून गाताना डोळे, ओठ, गळा, चेहरा व हातांची होणारी हालचाल याविषय़ी धडे घेताना दिसतोय. या पोस्टमध्ये रवी जाधव लिहीतात की, "‘बालगंधर्व’ चित्रपटातील गाणी गाणे जेवढे कठीण तेवढेच ती पडद्यावर लीप सिंक ( Lip Sync ) करणे. त्यासाठी गायक श्री. आनंद भाटे यांच्या पुणे येथील घरी जाऊन त्यांच्या समोर बसून आरशाप्रमाणे गाताना त्यांचे डोळे, ओठ, गळा, चेहरा व हातांची होणारी हालचाल टिपून घेण्याचा सुक्ष्म अभ्यास सुबोध भावे यांनी केला. स्कूटर वरुन सुबोध सोबत आनंदजींच्या घरी जाण्याचे मंतरलेले ते दिवस अजूनही आठवतात. कलाकारांनी एकादी भूमिका अजरामर करण्यासाठी काय काय करावे लागते, कोणकोणता अभ्यास करावा लागतो याची ही छोटीशी झलक. बालगंधर्व चित्रपटातील भूमिका उत्तम वठावी यासाठी सुबोधने केलेल्या अनेक अभ्यासापैकी एक."
या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणींचा साठा सोशल मिडीयावर शेयर करून रवी या चिपटाच्या आठवणीत रमलेले असल्याचं पाहायला मिळतय.