सध्या कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशा बिकट परिस्थितीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जण सकारात्मक संदेश देत आहेत. तर कुणी सगळ्यांना घरी राहण्याचं आवाहन करत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार असे आवाहन करण्यासाठी आणि लोकांना जागरुक करण्यासाठी कायम पुढे असतात. विशेषकरून या काळात सोशल मिडीयाचा वापर हा सकारात्मक होताना दिसत आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही सध्या सगळ्यांना घरातच राहण्याचं आवाहन करतेय आणि ही वेळ निघून जाईल सकारात्मक संदेश देत आहे. अपूर्वाने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, "हे ही दिवस जातील .... सरी सुखाच्या येतील"
या व्हिडीओत अपूर्वा म्हणतेय की, "आणि पुन्हा एकदा आपण थांबलो. आत्ता आपल्याला थांबावच लागेल. सांगू शकत नाही, बोलू शकत नाही असे वाईट प्रसंग कित्येक परिवारांवर आले. देव त्या सगळ्या परिवारांना शक्ति व बळ देवो. रोज आपल्या कानावरती खूप वाईट बातम्या येत आहेत. त्यामुळे आपण आणखी हतबल होतोय आणि घाबरुन जातोय. पण घाबरु नका ही वेळ सुद्धा निघून जाईल. वेळोवेळी स्वच्छ हात धुवा, सॅनिटायझर वापरा, मास्क लावा, तुमची इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष द्या."
याशिवाय भगवतगीतेतील श्रकृष्णाचही उदाहरण देत क्षण जपण्याचा संदेशही तिने दिलाय. अपूर्वाच्या या सकारात्मक संदेश असलेल्या व्हिडीओला फॉलोवर्सनी मोठ्या प्रमाणात लाईक केलय.