By  
on  

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला 'वेलकम होम' या दिवशी होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या लेखक दिग्दर्शकद्वयीचं स्थान फारच महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी नेहमीच आशयसंपन्न, विचारप्रवर्तक विषय चित्रपटांतून मांडले, त्यांच्या चित्रपटांचा अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये सन्मान झाला. असाच एक महत्त्वाचा विषय त्यांच्या "वेलकम होम" या चित्रपटातही मांडण्यात आला आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तर चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

घर या संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. त्यातही स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यात आला आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा वेलकम होम हा चित्रपटही चित्रपटप्रेमींच्या नक्कीच पसंतीला उतरेल , यात काहीच शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive