By  
on  

अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांच्या 'सडक' मधील या भूमिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष , ठरले लोकप्रिय खलनायक 

कोणत्याही चित्रपटात खलनायकालाही अनन्यसाधारण महत्त्व असते. तोही मुख्य पात्रांपैकीच एक असतो. त्यामुळे चित्रपटाच्या यशात आणि कहाणीला न्याय देण्यात त्याचाही मोलाचा वाट असतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच काही खलनायकांपैकी एक आहेत अभिनेता सदाशिव अमरापुरकर. त्यांनी साकारलेले खलनायक लोकप्रिय ठरले. 11 मे 1950 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जंयतीनिमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

सदाशिव अमरापुरकर यांनी आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी सडक सिनेमातील खलनायक लक्षवेधी ठरला होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक कायम लक्षात राहण्यासारखा आहे. या चित्रपटात त्यांनी किन्नरची भूमिका साकारली होती. या भूमिकेने सगळ्यांनाच थक्क केलं होतं. या भूमिकेसाठी त्यांना 1991 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला होता. दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या अर्ध सत्य या चित्रपटातून त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी त्यांनी मराठी नाटकांसाठी काम केलं होतं. अनेक मराठी नाटकांचं दिग्दर्शन आणि अभिनय ते करत होते शांता जोग, स्मिता पाटील, श्रीराम लागू, भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, नीना कुळकर्णी, सुहास जोशी या कलाकारांना त्यांनी दिग्दर्शित केलं होतं. 

'अर्ध सत्य' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा कालावधी लहान असला तरी या भूमिकेसाठीही त्यांचं कौतुक झालं होतं. 1984 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार म्हणून फिल्मफेयर पुरस्कार त्यांना मिळाला होता.  विधु विनोद चोपडा यांच्या खामोश या चित्रपटातही त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती. 

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र  यांच्यासोबतही त्यांनी काम केलेलं आहे. अभिनेता धर्मेंद्र तर सदाशिव यांना प्रचंड लकी मानत असे. धमेंद्र यांना सदाशिव यांचा अंदाज इतका आवडला की त्यांना खलनायक म्हणून सदाशिवच लागत असे. म्हणूनत धर्मेंंद्र यांच्यासोबत सदाशिव अमरापुरकर यांनी तब्बल 11 चित्रपट केले होते. 

उत्तम खलनायक साकारणारे सदाशिव अमरापुरकर यांचा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडायचा. त्यांच्यातील खलनायकी भूमिकेचा दरारा वेगळाच असे. त्यामुळे त्यांनी साकारलेले खलनायक आणि इतर भूमिकाही प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारे आहेत. याशिवाय त्यांनी विनोदी चित्रपटांमध्येही वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी सिनेकारकिर्दीत तब्बल 300 हून अधीक हिंदी, मराठी, बंगाली, हरियाणवी चित्रपटांमध्ये काम केलय. 

2014 मध्ये फुफ्फुसाच्या संसर्गाने त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली होती. त्या आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम हे प्रेक्षकांच्या ह्रदयात कायम घर करून आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive