क्रिकेट या खेळाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या चाहत्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचप्रेमापोटी काही चाहत्यांनी मिळून थेट चित्रपटाचीच निर्मिती केली होती. तेंडल्या असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं. या चित्रपटाला विविध राज्य पुरस्कारांसह राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मात्र सध्याच्या कोरोना काळात याच चित्रपटाचे दिग्दर्शक कलाकार यांना शेतात राबण्याची वेळ आली आहे. उसनवारी रक्कम आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी ही कलाकार मंडळी शेतात राबत आहेत. क्रिकेट आणि सिनेनिर्मितीने झपाटलेल्या या तरुणांवर आता कर्ज फेडण्यासाठी शेती करण्याची आणि भाजी विकण्याची वेळ आली आहे.
सध्या ते सांगलीच्या शिराळा तालुक्यातील साडेपाच एकर पडीक शेतीत काम करत आहेत. ही जमीन सध्या कराराने घेऊन चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले 1 कोटी 70 लाख रुपये फेडण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
वाळवा तालुक्यातील सामान्य कुटुंबामधील आठ तरुणांनी मिळून पैशांची जुळवजुळव करून या चित्रपटाची निर्मिती केली होती. 24 एप्रिल 2020 रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवसाला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचं संकट आल्याने मनोरंजन विश्व ठप्प झालं आणि सिनेमागृहे देखील बंद झाली. त्यामुळे या चित्रपटाची ही टीम आता मोठ्या संकटात सापडली आहे. चित्रपटासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी हे तरूण आता रात्र दिवस मेहनत करत आहेत. तेव्हा कुठेही मदतीचा हात न मागता या तरुणांनी आपल्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतय.
सचिन जाधव आणि चैतन्य काळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सचिन जाधव आणि नचिकेत वायकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या कर्ज फेडण्यासाठी शेतात काम करण्यासह या चित्रपटाचे कलाकार भाजी विकण्याचही काम करत आहेत. मात्र परिस्थितीत सुधारताच जेव्हा चित्रपटगृहे सुरु होतील तेव्हा षटकार मारु असा विश्वास या तरुणांना आहे.