प्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेता संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी रसिकांना आणि विशेषकरून तरुणांना संदीप खरे यांच्या कविता प्रचंड भावतात. या तरुणांसाठी आदर्श असलेले संदीप खरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चाहत्यांना रिटर्न गिफ्टही दिलं आहे.
संदीप खरे यांनी त्यांचा जुना फोटो शेयर करत ते लिहीतात की, “वाढदिवसाच्या निमित्ताने काल परवापासूनच शुभेच्छांचे सतत संदेश येत आहेत !! आता वय असं की वाढदिवस आला नाही तर बरं असं वाटावं. पण तरीही तुमचं प्रेम सदैव ताजंतवानं ठेवत आलं आहे !! आभाराचे औपचारिक शब्द अपुरे आहेत !! काय म्हणू ? ...एवढंच म्हणतो - कृतज्ञ आहे !! तुमच्या शुभेच्छांच्या गिफ्टसाठी परवाच लिहिलेल्या एका गझलची रिटर्न गिफ्ट देतो आहे...स्वीकार व्हावा !!”
या पोस्टमध्ये पुढे त्यांनी रिटर्न गिफ्ट असलेली गझलही पोस्ट केली आहे. ती गझल अशी..
गूढ दिवसरात्रीचे उकलण्यात वय गेले...
उमगले न काहि हेच उमगण्यात वय गेले ...!!
एक शब्द जपुन तुझा ओंजळीत ओलेत्या ....
'येशिल तू !' म्हणत वाट पाहण्यात वय गेले !!
गर्दीच्या वरवरच्या कौतुकात भिजताना ...
एकटेच आत खिन्न हासण्यात वय गेले !!
रंग गंध भरभरुन वेचण्यास ना कुणीच ...
हे उगाच वाळवंटि उमलण्यात वय गेले !!
मी पळीत भरलेला मद्याचा क्षीण थेंब ...
सांभाळुन सांभाळुन बहकण्यात वय गेले !!
बंद बाटल्याच येथ फक्त वरुन हाताळत...
ना पिताच प्याल्यागत बरळण्यात वय गेले !!
शब्दांना, भाषेला जोखताच नच आले ...
दुसऱ्यांनी लिहिलेले वाचण्यात वय गेले !!
अजुन रोज माथ्यावर स्मरणांचा चंद्र झरे ...
या अशा हजार रात्र चांदण्यात वय गेले !!
इच्छांना जन्म देत लावला लळा कितीक ...
बापासम मग तयांस उजवण्यात वय गेले !!
ही गझल वाचून संदीप खरे यांचे चाहते सुखावले असतील यात शंका नाही.