स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशीचा आगामी ‘मोगरा फुलला’ या सिनेमातील ‘मनमोहिनी’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने संगीतबद्ध आणि गायलं आहे.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिला पाहिल्यावर ती आपली 'मनमोहिनी' आहे असे वाटते, असंच काहीस दर्शवणारं, 'मोगरा फुलला 'या चित्रपटातील 'मनमोहिनी' हे रोमँटिक गाणे नुकतेच सोशल मीडियावरून प्रदर्शित होताच या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यात स्वप्नील जोशीसोबत सई देवधर नृत्य करताना आहे. हे गाणं अभिषेक कणखर यांनी लिहिलं असून फुलवा खामकर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

https://youtu.be/nupRXVEz4DY

"मनमोहिनी आज पाहिली, छबी तिची पाहता मनी राहिली..." असे या गाण्याचे शब्द आहेत. ''मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करताना मला फार मजा आली. अशा सुंदर कथेच्या सिनेमासाठी काम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होत. यासाठी मी जीसिम्सचे आभार मानतो. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचेदेखील मला खूप सहकार्य लाभले. कारण मला असं वाटत की, एखादं गाणं संगीतकाराला सुचण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचत आणि त्यानंतर संगीत दिग्दर्शक अचूक गाणं बनवतो. 'मनमोहिनी' हे गाणं करताना फार मज्जा आली. 'मनमोहिनी' हे पूर्णपणे रोमँटिक, श्रवणीय असं गाणं आहे आणि हे गाणं ऐकल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येईल त्याचबरोबर प्रत्येकजण हे गाणं स्वतःशी जोडेल एवढं नक्की’. या गाण्याबद्दलच्या अशा भावना या गाण्याचा गायक रोहित राऊत याने व्यक्त केल्या.

‘मोगरा फुलला' या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई देवधर हे प्रमुख भूमिकेत असून यांच्यासोबत चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु यांच्यासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळाल्या आहेत.यापूर्वी त्यांनी लपंडाव, सरकारनामा, लेकरू यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

‘जीसिम्स’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची निर्मिती असलेला ‘मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share