'कुसुम मनोहर लेले' पुन्हा रंगभूमीवर येण्याची शक्यता
१९९३ दरम्यान मराठी रंगभूमीवर आलेलं 'कुसुम मनोहर लेले' या नाटकाने इतिहास घडवला होता. या नाटकातील सुजाता देशमुख ही खूप गाजली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. संतोष कोचरेकर हे या नवीन रंगावृत्तीची निर्मिती करणार आहेत. तसेच प्रदीप मुळये हे या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत.
सुजाता देशमुख ह्या एका घटस्फोटीत महिलेला मनोहर लेले नावाचा इसम खोटे लग्नाचे आश्वासन देऊन फसवतो आणि तिचे मूल पळवतो, ही या नाटकाची कथा होती. एक गंभीर सामाजिक समस्या या नाटकाने मांडली होती. हे नाटक त्यावेळेस एवढं प्रसिद्ध झालं की या नाटकावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आली. विनय आपटे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. विनिता ऐनापुरे यांच्या ‘नराधम’ या कादंबरीवर हे नाटक आधारलेलं आहे. या नाटकाचं लेखन अशोक समेळ यांनी असून सुकन्या मोने, संजय मोने, गिरीश ओक, बाळ कर्वे यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार नाटकाच्या नव्या रंगावृत्तीत पल्लवी पाटील, संग्राम समेळ आणि शशांक केतकर या कलाकारांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. 'महाराष्ट्र रंगभूमी' या निर्मिती संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून लवकरच हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे.