रंगभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेले विनोदी नाटक 'दहा बाय दहा' मधील रव्या आणि त्याची आई सुनंदाचे पात्र वठवणारे कलाकार प्रथमेश परब आणि सुप्रिया पाठारे यांची चांगली गट्टी जमली आहे. केवळ पडद्यावर नव्हे, तर पडद्यामागे देखील आई मुलाची ही केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रथमेशने मदर्स डे निमित्ताने सुप्रिया पाठारे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे हे सिद्ध झाले आहे.
रंगभूमीवर सराव करताना सुप्रिया प्रत्येकांची आईप्रमाणे काळजी घेत असतात, असे तो पत्रात सांगतो, मात्र आता तिचीच तब्येत बरी नसल्याचे तो पुढे लिहीतो. त्यामुळे, 'दहा बाय दहा' नाटकाचा नाशिक दौरा देखील रद्द झाला असल्याचे सर्वश्रुत आहे. शिवाय, मुंबईतले प्रयोग ही लांबविण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, प्रथमेशने आईसम् असणाऱ्या सुप्रिया पाठारे यांना पत्र लिहित लवकर बरी हो असे म्हटले आहे. शिवाय, मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यास ही तो विसरला नाही!