मराठीसह हिंदी मालिकांमध्येही वेगळा ठसा निर्माण करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत झळकतेय. नुकतच स्नेहलताने 'मेरे साई' या मालिकेविषयी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने या मालिकेचे दिग्दर्शक सचिन आंब्रे यांचं कौतुक केले आहे. यासोबतच या पोस्टमध्ये सचिन यांच्यासोबतचे फोटो शेयर केले आहेत. सचिन हा स्नेहलताचा खास मित्र आहे.
स्नेहलता या पोस्टमध्ये लिहीते की, मागील दीड महिना खूप तडजोड करत शूटिंग सुरू होतं, त्यात फॅमिली पासून लांब,बायोबबलमध्ये दिनचर्या सुरू असताना अनेक भावनिक,मानसिक चढ-उतार ,नवीन जागा, तिथल्या जागेशी,तिथल्या कामाच्या पद्धतीशी जुळवून घेताना दमछाक व्हायची...पण अशा परिस्थितीतही स्वतःच्या आनंदापेक्षा ही एक मोठा आनंद असतो. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंदी करतो. खरंच माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण “माणुसकी“ ठराविक ठिकाणीच जन्म घेते आणि जिथे माणुसकी जन्म घेते तिथे “परमेश्वराचे वास्तव्य” असते. असा तू ....साईबाबांच्या विचारांचा सारथी...मेरे साई या मालिकेचा दिग्दर्शक आणि अभिमानाने सांगावं असा माझा मित्र सचिन “सचिन आंब्रे “"
स्नेहलता पुढे या पोस्टमध्ये लिहीते की, "यारों का यार, हाकेला धावून येणारा, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारा..... (बापरे खूपच कौतुक करतेय ना तुझं....) पण...तुझ्याकडे बघून हेच म्हणावसं वाटतं की चांगला स्वभाव गणितातल्या शून्य सारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते....मित्रा!असाच कायम माझ्यासोबत राहा आणि माझी श्रीमंती वाढवत राहा!! हीच साईंचरणी प्रार्थना"
कोरोना काळात राज्यात लॉकडाऊनमध्ये मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु होतं. या काळात कलाकारांसह संपूर्ण क्रूला विविध अडचणींना सामोरं जावं लागलं. अशा काळात सचिन सारख्या दिग्दर्शकाने दिलेली साथ आणि दाखवलेली माणुसकी लक्षात घेता स्नेहलताने ही पोस्ट केली आहे.