कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येच्या बातमीने मराठी मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. लेबर युनियन पदाधिकारीच्या जाचाला कंटाळून राजू यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्ये केली. यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. राजू उर्फ राजेश सापते यांना न्याय मिळण्यासाठी मागणी होऊ लागली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी राजू यांची समाजकंटकाच्या जाचाला कंटाळून केलेली आत्महत्या हे अत्यंत दूर्दैवी असल्याचं म्हटलय. राजू हे रवी जाधव यांचे वर्ग मित्र होते. रवी जाधव यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रवी जाधव लिहीतात की, "काल राजू साप्ते या अत्यंत अभ्यासू आणि गुणी कला दिग्दर्शकाने काही समाजकंटकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे अत्यंत दूर्दैवी आहे. राजू हा माझा जे. जे. मधील वर्ग मित्र. कॅालेज मधे तो काम करून, मेहनत करुन शिकत होता. अत्यंत शांत आणि संयमी राजूने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला यावरुन त्याला होणाऱ्या मानसिक त्रासाची कल्पना येते. त्याला लवकरात लवकर न्याय मिळो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो हिच प्रार्थना, ॐ शांती."
तेव्हा रवी जाधव यांच्यासह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ राजू यांना न्याय मिळण्यासाठी मागणी करताना दिसतायत.