एका आगळ्या विषयावर बेतलेल्या ‘चुंबक’ या मराठी सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय कुमार प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती अरुणा भाटिया आणि नरेन कुमार यांनी केली आहे. नरेन कुमार हे बॉलिवूडमधील एक प्रसिध्द निर्माते आहेत. ‘जॉली एलएलबी’, ‘जॉली एलएलबी 2’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ अशा सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणा-या नरेनजी यांनी ‘चुंबक’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
पिपींगमून मराठीने नुकताच निर्माते नरेन कुमार यांच्याशी सवांद साधला तेव्हा. यावेळी नरेनजी यांना चुंबक सिनेमाच्या एकूणच प्रक्रियेबद्दल विचारले असता ते म्हणाले, “चुंबकच्या प्रोजेक्टवर आम्ही जवळपास दीड-दोन वर्ष काम केलं. मला नेहमीच नवीन विषय हाताळायला आवडतात. दिग्दर्शक संदीप मोदींनी ज्यावेळी ‘चुंबक’चा विषय माझ्यासमोर मांडला तेव्हा तो मला मनापासून आवडला. मग आम्ही त्यावर काम सुरू केलं. लेखनापासून ते कास्टिंगपर्यंत संपूर्ण टिमच्या एकत्रित मेहनतीमुळे ‘चुंबक’ला आज उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रसन्न किरकिरे यांच्या सिनेमातील भूमिकेला तोड नाही.त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे तर साहिल जाधव आणि संग्राम देसाई या दोन नवोदित कलाकारांचा अभिनयाची तर दाद द्यायलाच हवी. आपल्या व्यक्तिरेखांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला आहे.”
मराठी सिनेमाबद्दल बोलताना नरेनजी पुढे सांगतात, “ मराठी सिनेमांमध्ये नेहमीच विषयाला महत्त्व दिलं जातं. इथे हिंदी सारखं प्रत्येकवेळेस नायक-नायिकेला मध्यवर्ती स्थान हा अट्टाहास नसतो. जो भूमिकेसाठी योग्य ठरेल त्यालाच कास्ट करण्यात येतं. मला स्वत:ला मराठी सिनेमे फार आवडतात. त्यातील वैविध्यता खुप भावते. म्हणूनच मी सध्या मराठी सिनेमांच्या दोन-तीन स्क्रिप्ट्सवर काम करत असून लवकरच यातून एका सिनेमावर शिक्कामोर्तब होईल.”
सर्वांनाचा आता नरेन कुमार यांच्या नव्या मराठी सिनेमाची उत्सुकता आहे.संपूर्ण पिपींगमून टीमकडून नरेन कुमार यांना आगामी सिनेमासाठी खुप खुप शुभेच्छा!