अभिनेत्री रसिका सुनील आणि बॉयफ्रेंड आदित्य बिलगी ही कपल जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. या कपलचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या लक्षवेधी ठरतोय. या व्हिडीओत रसिका ही बॉयफ्रेंड आदित्यसोबत डान्स करताना दिसतेय. आदित्यला नृत्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्याचे विविध डान्स व्हिडीओ तो सोशल मिडीयावर शेयर करतो. मात्र आता या व्हिडीओत रसिका आणि आदित्य एकत्र डान्स करताना पाहायला मिळतायत.
या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रसिका आणि आदित्य एकमेकांना डेट करत आहेत. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
सध्या सोशल मिडीयावर रसिकाच्या विविध पोस्टमधून आदित्य पाहायला मिळतोय. या गोड कपलचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघांनी 'रामुलू रामुला' या लोकप्रिय गाण्यावर धमाल डान्स केला आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका ही शनाया म्हणून लोकप्रिय झाली होती. मात्र शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी रसिकाला मधूनच मालिकेचा निरोप घ्यावा लागला. मात्र त्यानंतर परत आल्यावर रसिकाने पुन्हा शनाया म्हणून काम केलं.