'क्लासमेट्स', 'फास्टर फेणे', 'माऊली' आणि इतर मराठी, हिंदी सिनेमांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार त्यांचा आगामी हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत. 'ककुडा' असं या आगामी सिनेमाचं नाव असून आदित्य यांनी नुकतीच सिनेमाची घोषणा केली आहे.
या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख, साकिब सलीम आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असल्याचं कळतय. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला असून सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आलीय. या सिनेमातील कलाकार रितेश, सोनाली आणि साकिब यांच्यासह दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सोशल मिडीयावर या सिनेमाविषयी पोस्ट केली आहे.
आदित्य या पोस्टमध्ये लिहीतात की, "निर्माते रोनी स्क्रूवालासोबत माझा आगामी सिनेमा. चित्रीकरणाला आजपासून सुरुवात. तिहेरी त्रास वाटेवर आहे."
आदित्य यांनी सोशल मिडीयावर या सिनेमातील कलाकारांसोबतचा फोटो शेयर केला आहे. या फोटोत रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम पाहायला मिळत आहेत. सोनाक्षीच्या हातात सिनेमाचा क्लॅपबोर्ड पाहायला मिळतोय.
'माऊली' या मराठी सिनेमानंतर आदित्य या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा रितेश देशमुख सोबत काम करताना दिसतील. शिवाय या सिनेमाच्या निमित्ताने रितेश, सोनाक्षी आणि साकिब हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आलय. तेव्हा या हॉरर कॉमेडी सिनेमा काय खास पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.